गडचिरोलीत बनावट HTBT कापूस बियाण्यांवर कृषी विभागाची धाड, ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : चामोर्शी तालुक्यातील रामसागर येथे संशयित बनावट एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांची अवैध साठवणूक व विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत ३५ हजार ४३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ मे रोजी कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून रामसागर येथील संशयित ठिकाणी छापा टाकला. तपासणीदरम्यान ‘पुष्पा’, ‘बलवान’ आणि ‘मालामाल’ या वाणांच्या संशयित HTBT कापूस बियाण्यांची ३७ पाकिटे आढळून आली. यासोबतच बियाणे पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे सीलिंग मशीन आणि मोठ्या प्रमाणात कोरे पॅकेटही जप्त करण्यात आले.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, जप्त बियाण्यांची किंमत ३३ हजार ९३७ रुपये असून सीलिंग मशीनची किंमत अंदाजे १ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी देवेंद्र सदाशिव वन्नेवार (रा. रामसागर) यांच्या विरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) चेतन चलकलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्थानिक गुन्हे शाखा व चामोर्शी पोलिसांच्या सहकार्याने पार पाडली. मोहिमेत मोहीम अधिकारी आनंद पाल, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, कृषी अधिकारी चेतन चलकलवार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. बनसोडे आणि पोलीस अंमलदार राहुल रामटेके यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विकास अधिकारी किरण खोमणे आणि तालुका कृषी अधिकारी अमित तुमडाम यांनी मोहिमेस मार्गदर्शन केल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














