‘प्रशासन आपल्या दारी’चा फज्जा ; पुराडा मंडळ कार्यालयात अधिकारीच नाहीत…

100

‘प्रशासन आपल्या दारी’चा फज्जा ; पुराडा मंडळ कार्यालयात अधिकारीच नाहीत…
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १५ : तालुक्यातील महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या पुराडा येथील मंडळ अधिकारी कार्यालयाचा कारभार सध्या पूर्णपणे ‘राम भरोसे’ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मंडळ अधिकारी व संबंधित कर्मचारी कार्यालयात नियमितपणे हजर राहत नसल्याने नागरिकांची विविध महसुली कामे रखडली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पुराडा परिसरातील नागरिकांना उत्पन्न दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, शेतीविषयक नोंदी तसेच विविध महसुली कामांसाठी या कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. मात्र कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे “कार्यालय आहे, पण अधिकारी नाहीत” अशी अवस्था निर्माण झाली आहे.

तालुका मुख्यालयाचा मोह सुटेना

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी व अधिकारी पुराडा येथे उपस्थित राहण्याऐवजी कुरखेडा तालुका मुख्यालयातच अधिक वेळ घालवत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे गावपातळीवर नागरिकांची कामे प्रलंबित राहत असून सामान्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
काम नसताना कर्मचारी तालुक्यातच ठाण मांडून का बसतात? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. स्थानिक स्तरावर अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने तालुका मुख्यालय गाठावे लागत असून यासाठी अतिरिक्त खर्चही करावा लागत आहे.

घोषणांचा गाजावाजा, प्रत्यक्षात नागरिकांची फरफट

एकीकडे शासन ‘प्रशासन आपल्या दारी’सारख्या योजना राबवत असल्याचा दावा करत असताना, पुराडा येथे मात्र परिस्थिती याच्या अगदी उलट असल्याचे दिसून येत आहे. महिनाभराहून अधिक काळ अधिकारी कार्यालयात फिरकले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
आमच्या हक्काच्या कामांसाठी आम्ही नेमके कोणाकडे जायचे? गावात कार्यालय असूनही तालुक्याचे हेलपाटे मारावे लागत असतील, तर हे कार्यालय केवळ नावापुरतेच आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने दखल घेऊन कार्यालयातील उपस्थितीची चौकशी करावी तसेच कर्तव्यचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #kurkhedalocalnews #purada

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here