धानोरा : अवैध मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

36

धानोरा : अवैध मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
– महसूल विभागाची धडक कारवाई
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १५ : तालुक्यातील मोहलि परिसरात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत मुरूमाने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. १४ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास महसूल पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईमुळे मुरूम माफियांचे धाबे दणाणले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मोहलि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने परिसरात पाळत ठेवून कारवाईचे नियोजन केले. दरम्यान, मुरूमाने भरलेले एक ट्रॅक्टर संशयास्पदरीत्या जाताना दिसताच कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान कोणताही वैध परवाना नसताना मुरूमाची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले.
महसूल विभागाने तात्काळ ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३३ एडी ४६८७ जप्त केले. सदर वाहन हे मोहलि येथील किमदेव मेश्राम यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त केलेले वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून संबंधित वाहन मालकाविरोधात नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत नायब तहसीलदार देवेंद्र वाळके, नायब तहसीलदार अल्पेश बारापात्रे, महसूल सहाय्यक हितेश लांजेवार तसेच ग्राम महसूल सेवक योगेश नरचुलवार यांनी सहभाग घेतला.
अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे मोहलि परिसरातील अवैध मुरूम चोरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here