नागरिकांच्या हातात प्रशासन : ‘जननिवेदन’ पोर्टल व ‘गडचिरोली मित्र’ व्हॉट्सअॅप चॅटबॉटचा शुभारंभ
– घरबसल्या तक्रार नोंदणी, सेवांचा मागोवा व थेट संवादाची सुविधा उपलब्ध
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदणी, शासकीय सेवांची माहिती तसेच अर्जांच्या प्रगतीचा मागोवा घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने ‘जननिवेदन पोर्टल’ आणि ‘गडचिरोली मित्र’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट हे दोन महत्त्वाचे डिजिटल उपक्रम कार्यान्वित केले आहेत. मुख्यमंत्री १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने विकसित केलेल्या या ई-गव्हर्नन्स प्रणालींचा शुभारंभ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अस्मिता मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गणेश मेश्राम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती ज्योती कडू, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजभारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, जननिवेदन पोर्टल हे केवळ तक्रार नोंदणीचे साधन नसून नागरिकांच्या अपेक्षांना वेळेत प्रतिसाद देणारी, प्रशासनातील उत्तरदायित्व वाढविणारी आधुनिक डिजिटल व्यवस्था आहे. गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्ह्यात या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक व प्रशासन यांच्यात थेट, जलद व पारदर्शक संवाद प्रस्थापित होणार असून, हा उपक्रम सुशासनाच्या दिशेने एक आदर्श ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
कागदाधारित व्यवस्थेला डिजिटल पर्याय
मुख्यमंत्री १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारींचा विहित कालमर्यादेत निपटारा व्हावा, या उद्देशाने जननिवेदन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. टपाल व कागदोपत्री पद्धतीऐवजी आता तक्रार नोंदणीपासून अंतिम निवारणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया तंत्रज्ञानाधारित, वेळबद्ध व मागोवा घेण्यायोग्य झाली आहे.
नागरिकांनी तक्रार नोंदविण्यासाठी https://gadchirolicollector-nivedan.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करावा. तक्रार नोंदणी झाल्यानंतर प्राप्त युनिक आयडीच्या आधारे तक्रारीची सद्यस्थिती सहज पाहता येते.
या पोर्टलवर जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयांचे डिजिटल मॅपिंग करण्यात आले असून तक्रार संबंधित विभागाकडे त्वरित वर्ग केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांसाठी उपलब्ध रिअल-टाईम डॅशबोर्डमुळे एकूण तक्रारी, प्रलंबित प्रकरणे, विभागनिहाय कामगिरी व विलंबाची कारणे थेट पाहता येणार आहेत.
‘गडचिरोली मित्र’ – व्हॉट्सअॅपवर प्रशासन
नागरिकांना विविध शासकीय योजना, विभागनिहाय सेवा, पोर्टल्स व हेल्पलाईन क्रमांकांची माहिती एका क्लिकवर मिळावी, या उद्देशाने ‘गडचिरोली मित्र’ हा व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे. हा चॅटबॉट २४x७ कार्यरत असून नागरिकांनी अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक 9423562243 वर “Hi” असा संदेश पाठवल्यानंतर आवश्यक सेवांची माहिती मिळते.
या चॅटबॉटच्या माध्यमातून तक्रार नोंदणी, शासकीय योजनांची माहिती, विभागनिहाय सेवा, माहितीचा अधिकार (RTI), सेवा हमी कायदा २०१५ अंतर्गत सेवा, डिजिटल ७/१२ तसेच महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक थेट व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होतात. यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचून शासनाच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
प्रशिक्षण व अंमलबजावणी
या उपक्रमांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांसाठी जननिवेदन पोर्टल वापर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आतापर्यंत १०२ शासकीय कार्यालयांची नोंदणी पोर्टलवर झाली असून उर्वरित कार्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक कार्यालयाने समन्वयक नेमून तक्रारींच्या दैनंदिन कार्यवाहीची नियमित अद्ययावत नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी जननिवेदन पोर्टल व गडचिरोली मित्र या दोन्ही डिजिटल उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. या उपक्रमांमुळे गडचिरोली जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख, पारदर्शक व तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले असल्याचे त्यांनी नमूद केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













