धानोरा शहर अतिक्रमणाच्या विळख्यात ; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

66

धानोरा शहर अतिक्रमणाच्या विळख्यात ; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३० : धानोरा शहरात सर्वत्र बेकायदेशीर अतिक्रमणाने डोके वर काढले असून पंचायत समितीपासून पेट्रोल पंपापर्यंत अनेक ठिकाणी सर्रास अतिक्रमण झाल्याचे चित्र आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे नगरपंचायत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलसमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून काही दुकानदारांनी थेट शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच दुकाने थाटली आहेत. परिणामी संपूर्ण शाळा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला थेट धोका निर्माण झाला आहे. याशिवाय शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत.
या गंभीर व ज्वलंत विषयावर नुकत्याच पार पडलेल्या शाळा सुधार समितीच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. समितीच्या अध्यक्षा वेनुताई मशाखेत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष जमीर कुरेशी यांनी शाळेच्या वतीने नगरपंचायत धानोरा प्रशासनाला अतिक्रमण तात्काळ हटविण्याबाबत अधिकृत निवेदन सादर केले होते.
मात्र, निवेदन देऊन पंधरा दिवस उलटूनही नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे नगरपंचायत धानोरा ही अतिक्रमणधारकांची पाठराखण करत आहे काय? असा थेट सवाल नागरिक व पालकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच अतिक्रमण बिनधास्तपणे वाढत असल्याचा आरोप होत आहे.
शाळेच्या परिसरात अतिक्रमण कायम राहणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी जाणीवपूर्वक खेळ करण्यासारखे असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत धानोरा प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, नगरपंचायत धानोरा यांनी शहरातील सर्व ठिकाणची अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अशी ठाम मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanoranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here