जीवघेणा प्रवास! कुरखेडा-कुंभीटोला मार्गावर रस्त्यावरच धान वाळवणी
– अपघाताचा धोका वाढला
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १६ : तालुक्यातील कुरखेडा ते कुंभीटोला या मुख्य मार्गावर सध्या रस्त्यावरच धान वाळत घालण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे वाहनधारकांचा प्रवास अक्षरशः जीवघेणा बनला आहे. रस्त्याच्या मधोमध धान पसरविल्यामुळे मार्ग अरुंद झाला असून वाहनांना डांबरी रस्ता सोडून बाजूच्या खालच्या भागातून मार्ग काढावा लागत आहे. परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उसळत असून अपघाताची भीती वाढली आहे.
स्थानिकांच्या मते, या मार्गावर दररोज दुचाकी, चारचाकी तसेच शालेय वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावर धान वाळविल्यामुळे वाहनचालकांना समोरून येणारी वाहने दिसेनाशी होत आहेत. धुळीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रासही जाणवत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे संबंधित प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्यावर धान वाळविणे हा नियमबाह्य प्रकार असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
जुन्या भीषण अपघाताची आठवण ताजी
यापूर्वी उराडी-सोनसरी मार्गावर अशाच प्रकारे रस्त्यावर धान वाळत घातल्यामुळे भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत एका ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. एवढी गंभीर घटना घडूनही प्रशासनाने धडा घेतलेला नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक ग्रामपंचायतीकडे याबाबत विचारणा केली असता केवळ टाळाटाळ करणारी उत्तरे मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्यावरील धान हटवावे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














