स्पर्धा परीक्षांसाठी सुवर्णसंधी! गोंडवाना विद्यापीठात निशुल्क मार्गदर्शन केंद्र लवकरच

137

स्पर्धा परीक्षांसाठी सुवर्णसंधी! गोंडवाना विद्यापीठात निशुल्क मार्गदर्शन केंद्र लवकरच
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय सेवेत जाण्याच्या स्वप्नांना आता नवे बळ मिळणार आहे. गोंडवाना विद्यापीठ येथे लवकरच ‘निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ सुरू होणार असून, विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक आणि महत्त्वाची संधी ठरणार आहे.
या संदर्भातील ठराव अधिसभेत मांडण्यात आला होता. अधिसभा समितीच्या शिफारशींना व्यवस्थापन परिषदेची मंजुरी मिळाल्याने केंद्र सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससी सारख्या प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार आहे.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीत योग्य दिशा, नियोजनबद्ध अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नियमित टेस्ट सिरीज, उत्तरलेखन सराव, शंका निरसन सत्रे यांसह सर्वांगीण तयारीची सुविधा मिळणार आहे.
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत असून, समन्वयक म्हणून डॉ. वैभव मसराम कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात 100 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया

या केंद्राचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाणार असून, अर्जदार हा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयाचा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.

उपलब्ध सुविधा

केंद्रात सुसज्ज ग्रंथालय, शांत वाचन कक्ष, अद्ययावत संदर्भ पुस्तके, चालू घडामोडींचे साहित्य, वर्तमानपत्रे व मासिके उपलब्ध असतील. याशिवाय डिजिटल बोर्ड, आधुनिक क्लासरूम, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित सराव चाचण्या यामुळे विद्यार्थ्यांची तयारी अधिक सक्षम होणार आहे.

पुण्यातील नामांकित कंपनीमार्फत या केंद्राचे काम सुरू असून, लवकरच हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे.
हा उपक्रम ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवी दिशा देणारा ठरणार असून, त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #gondwananews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here