राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण बंधनकारक ; २.१० कोटी विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण

28

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण बंधनकारक ; २.१० कोटी विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण
-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश; ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत आठवड्यातून दोन तासिका
The गडविश्व
मुंबई, दि. १५ : राज्यातील सर्व माध्यमांच्या १ लाख ८ हजार शाळांमधील सुमारे २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
राज्यात सध्या ३० हजार शाळांमधील सुमारे १७ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तो राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत परेड, संचलन आणि देशभक्तिपर गीतांवरील कवायती बंधनकारक करण्यात येणार आहेत. तसेच ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत आठवड्यातून दोन तासिका स्काऊट-गाईडसाठी घेण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.
या प्रशिक्षणासाठी शाळांमधील शिक्षकांना तालुकास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शुल्क आणि प्रशिक्षकांचे मानधन शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्काऊट-गाईडमधील राज्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना सध्या तीन, तर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक मंगेश जोशी, उपसचिव तुषार महाजन, स्काऊट-गाईडचे सहायक राज्य सचिव रमेश जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here