चाकोरी मोडून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या दहा महिलांचा ‘मनमुक्त’कडून गौरव

57

चाकोरी मोडून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या दहा महिलांचा ‘मनमुक्त’कडून गौरव
– ‘चाकोरीबाहेरील मैत्रिणी’ कृतज्ञता सोहळा उत्साहात
The गडविश्व
पुणे, दि. ०९ : घर, कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा महिलांचा मनमुक्त फाउंडेशनच्या वतीने कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. पाषाण येथील सी.पी.आर. सभागृहात आयोजित ‘चाकोरीबाहेरील मैत्रिणी’ या अभिनव सोहळ्यात महिलांच्या संघर्षाला सलाम करत त्यांच्या सामाजिक योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी ‘ये हृदयीचे ते हृदयी’ या पुस्तकाच्या पोस्टरचे अनावरण, तसेच ‘लेट्स इव्हॉल्व्ह’ या नव्या मासिकाचा शुभारंभ करण्यात आला.

संघर्षातून कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान

वेदनेवर मात करून, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल या सोहळ्यात घेण्यात आली. दीपाली बांद्रे, दीपाक्षी शिंगारे, मनीषा गंपले, प्रियंका भिडे, प्रतिभा गुरव, प्रणोती शितोळे, राजश्री चिंतामणी, रेणुका कड, सायली चौगुले आणि विद्या काटकर या दहा महिलांचा गौरव करण्यात आला.
प्रत्येक महिलेचा जीवनप्रवास वेगळा असला, तरी स्वतःच्या चौकटीपलीकडे जाऊन समाजासाठी योगदान देण्याची जिद्द आणि सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या कार्यातील समान धागा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. हा सोहळा केवळ पुरस्कार देण्यापुरता मर्यादित न राहता महिलांच्या संघर्षाला सलाम करणारा आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठरला.

पुस्तक आणि नव्या मासिकाचा शुभारंभ

या सोहळ्याच्या निमित्ताने दिव्या भोसले लिखित ‘ये हृदयीचे ते हृदयी’ या मनमुक्त फाउंडेशनशी संबंधित पुस्तकाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तसेच २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘लेट्स इव्हॉल्व्ह’ या नव्या मासिकाचा शुभारंभ करण्यात आला.
‘समजून घ्या. चिंतन करा. घडत चला.’ हा विचार केंद्रस्थानी ठेवणारे हे मासिक व्यक्तीला स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी, आत्मचिंतन करण्यासाठी आणि अधिक सजग व संवेदनशील जीवन जगण्यासाठी प्रेरित करणार आहे. हे मासिक दर महिन्याला प्रकाशित करण्यात येणार आहे.

समाजासाठी झटणाऱ्या महिलांच्या योगदानाची दखल

आजच्या काळात यशाची व्याख्या अनेकदा पद, पैसा आणि प्रतिष्ठेपुरती मर्यादित राहते. मात्र, एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणे, निराधारांना आधार देणे आणि समाजपरिवर्तनासाठी सातत्याने कार्यरत राहणे, हेही कर्तृत्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. याच जाणिवेतून ‘चाकोरीबाहेरील मैत्रिणी’ हा उपक्रम साकारण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना मनमुक्त फाउंडेशनच्या संचालिका अस्मिता काळे यांनी केली. ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादक गीताली वी. मं., पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि डॉ. वर्षा कुऱ्हाडे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. डॉ. पराग कलण, दिव्या भोसले आणि प्रथमेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले, तर फाउंडेशनच्या संचालिका मनीषा कुऱ्हाडे यांनी आभार मानले.
मनमुक्त फाउंडेशनच्या ‘व्यक्त व्हा • रिक्त व्हा • मुक्त व्हा’ या विचारधारेतून साकारलेला हा सोहळा महिलांचे कर्तृत्व, त्यांचा संघर्ष आणि सामाजिक योगदान यांचा गौरव करणारा ठरला. महिलांच्या कार्याला सन्मान देतानाच नव्या विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम फाउंडेशनच्या सामाजिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here