कुरखेडा : Mahindra XUV3XO च्या एअरबॅगवर प्रश्नचिन्ह; ग्राहकाची वाहन बदलण्याची मागणी

5

कुरखेडा : Mahindra XUV3XO च्या एअरबॅगवर प्रश्नचिन्ह; ग्राहकाची वाहन बदलण्याची मागणी
– अपघातात एअरबॅग न उघडल्याचा आरोप; निष्पक्ष तांत्रिक तपासणीची पत्रकार परिषदेतून मागणी
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०७ : अपघातावेळी वाहनातील एअरबॅग कार्यान्वित न झाल्याचा आरोप करत मालेवाडा येथील वाहनधारक रामसुख किशनराम चोयल यांनी महिंद्रा XUV3XO AX5 1.5 Turbo Diesel वाहनाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एअरबॅगसह वाहनाच्या संपूर्ण सुरक्षा यंत्रणेची स्वतंत्र व निष्पक्ष तांत्रिक तपासणी करून दोष आढळल्यास वाहन बदलून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चोयल यांनी सांगितले की, त्यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये वैयक्तिक वापरासाठी हे वाहन खरेदी केले होते. ५ ऑगस्ट २०२६ रोजी कुरखेडा-राजनांदगाव मार्गावर पुराडा-बेडगाव घाट परिसरात समोरून आलेल्या ट्रकने त्यांच्या MH33AD3681 वाहनाला जोरदार धडक दिली. अपघातावेळी चालक व सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावलेले असतानाही वाहनातील एअरबॅग उघडल्या नसल्याचा त्यांचा आरोप आहे.या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालकासह अन्य प्रवाशांना दुखापत झाली. घटनेनंतर संबंधित ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही चोयल यांनी सांगितले.
अपघातानंतर वाहन विम्याअंतर्गत अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले. मात्र, एअरबॅग न उघडल्याबाबत कंपनी व अधिकृत विक्रेत्याकडे तक्रार करूनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

निष्पक्ष तपासणीची मागणी

वाहनातील एअरबॅग तसेच इतर सुरक्षा यंत्रणेची स्वतंत्र आणि निष्पक्ष तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी चोयल यांनी केली आहे. तपासणीत उत्पादनदोष अथवा सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्यास सध्याचे वाहन बदलून त्याच मॉडेलचे नवीन वाहन द्यावे. अन्यथा वाहनासाठी भरलेली संपूर्ण रक्कम परत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणी संबंधित पक्षांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून समाधानकारक तोडगा न निघाल्यास ग्राहक आयोगासह सक्षम न्यायालयीन प्राधिकरणाकडे दाद मागणार असल्याचे चोयल यांनी स्पष्ट केले.
“माझा उद्देश कोणत्याही कंपनीची बदनामी करणे नसून ग्राहकांची सुरक्षितता, निष्पक्ष तपासणी आणि न्याय्य तोडगा मिळविणे हा आहे,” असे चोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #MahindraXUV3XO #XUV3XO #AirbagFailure #RoadAccident #VehicleSafety #CustomerComplaint #ConsumerRights #Kurkheda #Gadchiroli #Maharashtra #AutomobileSafety #RoadSafety #CarSafety #ConsumerCourt #VehicleComplaint

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here