कुरखेडा : गावालगत बिबट्याचा थरार; गर्दी होताच झाडावर चढला, वाघभूमीत घबराट
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०७ : तालुक्यातील मालेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत खामतळा ग्रामपंचायत हद्दीतील वाघभूमी टोली येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास बिबट्याने गावालगत प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. बिबट्या दिसताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मात्र, नागरिकांची चाहूल लागताच बिबट्याने लगतच्या बिजाच्या झाडावर चढून आश्रय घेतला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना घटनास्थळापासून दूर हटवून परिसर मोकळा केला. सुमारे तासभर बिबट्या झाडावरच बसून राहिला. अखेर सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तो झाडावरून खाली उतरला. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी कोणतीही हानी होऊ न देता बिबट्याला जंगलाच्या दिशेने सुरक्षितपणे पिटाळून लावले.
दरम्यान, गावालगत बिबट्या थेट झाडावर चढून बसल्याची माहिती परिसरात पसरल्याने वाघभूमी टोलीसह आसपासच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाव जंगलालगत असल्याने बिबट्या पुन्हा रात्रीच्या वेळी गावात येण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणारे नागरिक, शेतकरी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वनविभागाच्या कारवाईवर नागरिकांचा रोष
बिबट्या गावालगत आल्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, बिबट्याला जेरबंद करण्याऐवजी जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्यात आल्याने काही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. बिबट्या पुन्हा गावात परतला किंवा त्याने नागरिकांवर हल्ला केला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
बिबट्याचा वावर लक्षात घेता वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात तसेच बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #kurkhedanews













