कुरखेडा तालुक्यात दोन भीषण अपघात; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू

7

कुरखेडा तालुक्यात दोन भीषण अपघात; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू
– मालेवाडा-धनेगाव मार्गावरील अपघातात दुसरा बळी; गुरनोलीजवळ ट्रॅक्टर-दुचाकी धडकेत दोन युवकांचा मृत्यू
The गडविश्व
ता. प्र./कुरखेडा, दि. ०४ : कुरखेडा तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन भीषण रस्ते अपघातांत एका चिमुकलीसह चार जणांचा मृत्यू झाला. मालेवाडा-धनेगाव मार्गावरील दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत जखमी चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गुरनोली गावाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन युवकांनीही प्राण गमावले. या घटनांमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मालेवाडा-धनेगाव मार्गावर सोमवारी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात फाल्गून ऋषी गुरनुले (४४, रा. धनेगाव) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या दुचाकीवरील किशोर छगन नैताम (३५) आणि त्यांची मुलगी भाग्यश्री (४ ते ५ वर्षे) गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्राथमिक उपचारानंतर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना भाग्यश्रीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील ती दुसरी मृत व्यक्ती ठरली असून, तिच्या वडिलांची प्रकृतीही गंभीर असल्याची माहिती आहे.

दुसरी घटना गुरनोली गावाजवळ घडली. आकाश सदाशिव कोडवते (३५) आणि श्रीहरी टिकाराम पेंदाम (२२), दोघेही रा. गुरनोली, हे ३ नोव्हेंबर रोजी दुचाकीने गेवर्धा येथून गावाकडे परतत होते. यावेळी पुलाजवळ शेतातून धान भरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या इंजिनला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिकेने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलवित असताना विसोरा गावाजवळ दोघांचाही मृत्यू झाला.

दरम्यान, मालेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने चिमुकलीला पुढील उपचारासाठी हलविण्यात विलंब झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे, तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यांची सुधारणा आणि वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #accident #Gadchiroli #Kurkheda #RoadAccident #FatalAccident #RoadSafety #MaharashtraNews #GadchiroliNews #MaharashtraAccident #BreakingNews #AccidentNews #RoadSafetyAwareness #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here