दुर्गम कुरखेड्यातील शैक्षणिक कार्याची दखल; प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०५ : श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, कुरखेडाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. जे. पी. नाईक आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या शानदार सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च शिक्षण राज्यमंत्री, विद्यापीठाच्या कुलगुरूंसह उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, महाविद्यालय आणि समाजाच्या विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांसह प्रदीर्घ व समर्पित शैक्षणिक कार्याची दखल घेऊन डॉ. मुनघाटे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. गेल्या २३ वर्षांपासून ते मुनघाटे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. गोंडवाना विद्यापीठ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ प्राचार्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
उपक्रमशील प्राचार्य म्हणून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये त्यांची ओळख आहे. त्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे अध्यक्षपद भूषविले असून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य तसेच मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही काम केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, बालभारती पुणेचे सदस्य तसेच मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यासमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. नॅक पिअर टीमचे सदस्य म्हणून त्यांनी देशातील विविध राज्यांतील महाविद्यालयांना भेटी देऊन शैक्षणिक मूल्यमापनात योगदान दिले आहे.
डॉ. मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात उन्नत भारत अभियान, टोबॅको अवेअरनेस सेंटर, वेलनेस क्लब, मूव्ही क्लब, महिला अध्ययन, लोकसंख्या शिक्षण, सांप्रदायिक सद्भावना, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक व क्रीडा विभाग, रोजगार मार्गदर्शन केंद्र आणि एनआयआरएफ यांसारखे विविध उपक्रम सुरू करण्यात आले. या उपक्रमांचा विद्यार्थी तसेच समाजाला मोठा लाभ होत आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाला सलग पाच वर्षे गोंडवाना विद्यापीठात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन लेख प्रकाशित केले असून चीन, रशिया, दुबई, बाली, सिंगापूर आणि मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन संशोधनपत्रे सादर केली आहेत. दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोलीचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.
शैक्षणिक, संशोधन, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची यापूर्वीही विविध संस्थांनी दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार, गोंडवाना विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य पुरस्कार, ग्लोबल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड यांसह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम कुरखेड्यासारख्या भागात सातत्याने शैक्षणिक गुणवत्ता व विविध उपक्रमांना चालना देणाऱ्या डॉ. मुनघाटे यांना मिळालेला राज्यस्तरीय सन्मान हा कुरखेड्यासह संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या पुरस्काराबद्दल शिक्षण, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













