मतदार यादीत मोठी उलथापालथ; गडचिरोलीत २७ हजार ‘अनमॅप्ड’, ५६ हजार नोंदी विसंगत
– गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर : ७.३८ लाख मतदारांचा समावेश, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकतींची संधी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित या प्रारूप यादीत जिल्ह्यातील ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांचा समावेश आहे. मतदारांना प्रारूप यादीवर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.
प्रारूप मतदार यादीतील आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार ८७८ पुरुष, ३ लाख ६५ हजार ४११ महिला आणि १२ तृतीयपंथी मतदार आहेत. याशिवाय अनुपस्थित, स्थलांतरित, मृत अथवा अन्य कारणांमुळे वर्गीकृत केलेल्या मतदारांची संख्या ९० हजार ६१६ इतकी आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली.
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालये देसाईगंज, गडचिरोली आणि अहेरी, सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये तसेच जिल्ह्यातील ९७३ मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातही ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२७ हजार ‘अनमॅप्ड’ मतदार
विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान जिल्ह्यातील २७ हजार ४१४ मतदारांच्या नोंदी पूर्वीच्या नोंदीशी जुळवणी न झाल्याचे (‘अनमॅप्ड’) आढळून आले आहे. तर ५६ हजार ८५२ मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळली आहे. या नोंदींची पडताळणी करण्यासाठी संबंधित मतदारांना सुनावणीची संधी देण्यात येणार आहे.
यासाठी ECI NET पोर्टलवरून संबंधित मतदारांसाठी नोटीस ऑटो जनरेट होणार असून, मतदार नोंदणी अधिकारी त्यामध्ये सुनावणीची तारीख व ठिकाण नमूद करून संबंधितांना नोटीस उपलब्ध करून देतील. मतदान केंद्रनिहाय मतदारांची संख्या लक्षात घेऊन शहरी तसेच ग्रामीण भागात सुनावणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकतींची संधी
प्रारूप मतदार यादीत नाव, पत्ता किंवा इतर नोंदींबाबत त्रुटी आढळल्यास नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६पर्यंत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. तसेच ज्या मतदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही, अशा मतदारांची अद्ययावत यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सुनावणीसाठी नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी निर्धारित दिवशी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहावे, तसेच मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.













