आरमोरी : गोतस्करांच्या आवळल्या मुसक्या,३२ जनावरांसह १९.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
– चार आरोपी अटकेत,सहा जनावरे मृतावस्थेत आढळली, तिघांचा शोध सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ३२ गोवंशीय जनावरांसह दोन चारचाकी वाहने व तीन मोबाईल असा एकूण १९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे जप्त केलेल्या ३२ जनावरांपैकी चार गायी व दोन बैल अशी सहा जनावरे मृतावस्थेत आढळून आली.
२८ ऑगस्ट रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की, गोवंशाने भरलेले आयसर वाहन ठाणेगाव-आरमोरी टी-पॉईंट मार्गे जाणार आहे. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांनी ठाणेगाव टी-पॉईंट परिसरात सापळा रचला.
काही वेळात दोन चारचाकी वाहने पायलटिंग करताना आणि त्यांच्या मागून आयसर वाहन येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी आयसर वाहन अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये २६ गायी व ६ बैल अशी ३२ जनावरे अक्षरशः कोंबून निर्दयतेने भरल्याचे आढळले. पोलिसांना पाहताच वाहनातील दोघांनी जंगलाच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून प्रणय समीर जांभुळकर (२०, रा. आंधळी, ता. कुरखेडा) याला ताब्यात घेतले.
दरम्यान, पायलटिंग करणाऱ्या काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता चालक वाहनासह पसार झाला. त्याच्या मागे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर वाहनालाही पोलिसांनी अडवले. मात्र, त्यातील तिघांनी वाहन सोडून जंगलाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून शेहबाज सलाम शेख (३१, रा. विवेकानंदनगर, गडचिरोली), शोहेब फारुक शेख (२७) व शेख आकिब नासीर शेख (दोघेही रा. जाफरनगर, नागपूर) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत अटक आरोपींनी पळून गेलेल्या क्रेटा वाहनातील शहजाद शेख (रा. कुरखेडा) व जमील कुरेशी (रा. गेवर्धा) यांच्या सांगण्यावरून गोवंशाने भरलेल्या आयसर वाहनाची पायलटिंग करत असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंचांसमक्ष केलेल्या तपासणीत ३२ गोवंशीय जनावरांची किंमत ५ लाख ९५ हजार रुपये, आयसर वाहनाची किंमत १० लाख रुपये आणि स्विफ्ट डिझायरची किंमत तीन लाख रुपये, तसेच तीन मोबाईल असा एकूण १९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त जनावरांची वैद्यकीय तपासणी केली असता चार गायी व दोन बैल असे सहा जनावरे मृत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून शहजाद शेख, जमील कुरेशी व आयसर वाहनाचा अज्ञात चालक यांचा शोध घेतला जात आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कांबळे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांच्या पथकाने केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews













