कुरखेड्यात गोवंश तस्करीचा डाव उधळला; 19 जनावरांसह 19.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
– एक ट्रक व चारचाकी वाहन जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : गेवर्धा ते केशोरी मार्गावर गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत 19 गोवंशीय जनावरांसह दोन वाहन असा एकूण 19 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
24 ऑगस्ट रोजी रात्री गोवंशाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गेवर्धा गावाजवळ सापळा रचला. काही वेळातच ट्रक आणि बोलेरो पिकअप अशी दोन संशयित वाहने येताना दिसली. पोलिसांनी दोन्ही वाहने अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये गोवंशीय जनावरे कोंबून भरल्याचे आढळून आले. वाहतुकीसाठी आवश्यक परवानाही आरोपींकडे नव्हता.
TG 12 U 4896 क्रमांकाच्या ट्रकमध्ये 11 गायी व 2 बैल, तर MH 35 AJ 4601 क्रमांकाच्या बोलेरो पिकअपमध्ये 4 गायी व 2 बैल आढळून आले. एकूण 19 जनावरांची किंमत सुमारे 2 लाख 65 हजार रुपये आहे. याशिवाय 12 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि 5 लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 19 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी ट्रकचालक शेख इब्राहिम शेख इस्माईल (वय 40, रा. नागपूर) आणि बोलेरो चालक मुफस्सील कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी (वय 25, रा. नागपूर) यांच्याविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज. जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे व कुरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांच्या पथकाचा सहभाग होता.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













