केक-पार्टीऐवजी शिक्षणाची साथ ; जान्हवी चन्नावार यांचा प्रेरणादायी वाढदिवस

5

केक-पार्टीऐवजी शिक्षणाची साथ ; जान्हवी चन्नावार यांचा प्रेरणादायी वाढदिवस
The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा आदर्श उपक्रम इंजिनिअर जान्हवी प्रविण चन्नावार यांनी मवेली येथे राबविला. वाढदिवसानिमित्त गावातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
आजच्या काळात वाढदिवस म्हटला की केक, पार्टी आणि जल्लोषावर मोठा खर्च केला जातो. मात्र, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत जान्हवी चन्नावार यांनी वाढदिवसाला समाजोपयोगी स्वरूप देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत त्यांनी इतरांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
चन्नावार कुटुंबीयांकडून दरवर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत केली जाते. यंदाही विद्यार्थ्यांना शालेय उपयोगाचे साहित्य देण्यात आले. यासोबतच खाऊचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालण्यात आली.
‘शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी कौतुक केले. वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंसोबत वाटल्यास त्यातून मिळणारे समाधान अधिक मोठे असते, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती केशव पुडो, पोलीस पाटील शिवाजी मठामी, लालाजी मठामी, मनोज मतामी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जोगेंदर कुजूर, मनीष टोपो, आकाश मतामी, सोमेश्वर येलपुलवार, अंगणवाडी सेविका निता येलपुलवार, पर्यवेक्षक दुर्वा मॅडम, आरोग्यसेविका संगीता उसेंडी, आरोग्यसेवक राणा, सुरज मतामी, रविंद्र मतामी, संदीप कुजूर यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल पुडो यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन संजय मटामी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल मतामी, जनी घीसू मटामी, करिष्मा मतामी, माधुरी मतामी यांच्यासह अन्य नागरिकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here