वागदऱ्यात सप्तरंगी ध्वजाखाली आदिवासी अस्मितेचा जागर ; जागतिक आदिवासी दिन उत्साहात

34

वागदऱ्यात सप्तरंगी ध्वजाखाली आदिवासी अस्मितेचा जागर ; जागतिक आदिवासी दिन उत्साहात
The गडविश्व
ता.प्र/कुरखेडा, दि. १० : ‘नवयुवक आदिवासी बिरसा मुंडा वागदरा/रामगड’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (९ ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त वागदरा येथे सप्तरंगी ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.
‘वसुंधरेचा ठेवा जपुनी राखू, सृष्टीचा सन्मान; निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही आदिवासी, म्हणुनी आम्हा आहे अभिमान’ तसेच ‘आमची संस्कृती, आमचा अभिमान; मी आदिवासी, माझा स्वाभिमान’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवक-युवती व ग्रामस्थांनी आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविले.

‘आदिवासी सुरक्षित तर जंगल सुरक्षित’

कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ‘आदिवासी सुरक्षित तर जंगल सुरक्षित, जंगल सुरक्षित तर पर्यावरण सुरक्षित आणि पर्यावरण सुरक्षित तरच जग सुरक्षित’ असा संदेश यावेळी देण्यात आला. बदलत्या काळातही आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते अबाधित ठेवण्याचे आवाहन युवा पिढीला करण्यात आले.
या सोहळ्याला रामगड ग्रामपंचायतीचे सरपंच मोरेश्वर मडावी, गणपत उसेंडी, वागदरा पोलीस पाटील मंगलाताई दखने, जामटोला पोलीस पाटील रेखाताई दखने, मंगलसिंग मडावी, रातीराम उसेंडी, रघुनाथ मडावी, हिराजी बनसोड, गणेश मडावी, तलाठी प्रवीण नैताम, देवराव मडावी, समीर गावळे आणि मंगेश नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक तसेच आदिवासी समाजातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्तरंगी ध्वजारोहण आणि पारंपरिक वातावरणातून आदिवासी अस्मिता, संस्कृती, स्वाभिमान आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश देत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here