शेतकरी कर्जमाफी व वीजबिल थकबाकी माफीचा निर्णय ऐतिहासिक; डॉ. अशोक नेते यांच्याकडून सरकारचे अभिनंदन

19

शेतकरी कर्जमाफी व वीजबिल थकबाकी माफीचा निर्णय ऐतिहासिक; डॉ. अशोक नेते यांच्याकडून सरकारचे अभिनंदन
– ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : राज्यातील शेतकरी, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शेतकरी कर्जमाफीसह वीजबिल थकबाकी माफीचा निर्णय ऐतिहासिक असून, या निर्णयांबद्दल माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
गडचिरोली येथील निवासी जनसंपर्क कार्यालयात डॉ. नेते यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शेतकरी कर्जमाफी, वीजबिल थकबाकी माफी तसेच कृषी क्षेत्रातील विविध योजना आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली.
राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांपेक्षा अधिक व्यापक स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे डॉ. नेते यांनी नमूद केले.

४८ हजार कोटींची वीजबिल थकबाकी माफ

शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिल थकबाकी माफ करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. नेते यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासह दिवसा वीज देण्याच्या दिशेने शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मागेल त्याला शेततळे’ आणि ‘जलयुक्त शिवार’ यांसारख्या योजनांना गती देण्यात येत असून, शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडण्याचे कामही सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महिला शेतकरी सक्षमीकरण, कृषी पंपांची वीजमाफी, पीकविमा, कृषी यांत्रिकीकरण आणि कृषी सिंचन यांसह विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. कापूस, कांदा आणि सोयाबीन यांसारख्या पिकांची शासनाकडून खरेदी करून शेतकऱ्यांना बाजारभावातील चढ-उतारापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही नमूद करण्यात आले.
“शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची वाटचाल सुरू आहे,” असे डॉ. अशोक नेते यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, रेखा डोळस, प्रकाश गेडाम, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, अनिल कुनघाडकर, डॉ. भारत खटी, सीमा कन्नमवार, दत्तू सुत्रपवार, मधुकर भांडेकर, गोवर्धन चव्हाण, सुधाकर पेटकर, विलास भांडेकर, वर्षा शेडमाके, विनोद देवोजवार, सलिम शेख यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत शासनाच्या विविध शेतकरीहितैषी योजना व निर्णयांची माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here