‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ ; कोरचीत २५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
– छत्रपती शिवाजी महाराज बचत गट व अदानी सिमेंट ग्रुपचा संयुक्त उपक्रम
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. २४ : रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचा संदेश देत छत्रपती शिवाजी महाराज बचत गट, कोरची आणि अदानी सिमेंट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय, कोरची येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली. यासोबतच अनेक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली.
रक्ताची गरज कधीही आणि कोणालाही भासू शकते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियाग्रस्त रुग्ण, गंभीर आजारांनी पीडित व्यक्ती तसेच गर्भवती महिलांसाठी वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला पोलीस स्टेशन कोरचीचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सदरुद्दीन भामानी, मनोज अग्रवाल, डॉ. कृणाल सरदारे, मिथुन मोडक, निनाद फुंडे, डॉ. सचिन बरडे, राहुल सिडाम, प्रफुल राऊत, वैजनाथ पोते, शरद बांबोडे, बंडू कुंभारे, निकेश भालेराव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
शिबिरात विनायक लिंगायत, मनोज सारवा, नीलकंठ मडावी, हिमांशू सोनटक्के, शिवा कोरेटी, रवींद्र अटेला, पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, मनोज अग्रवाल, सुरज हेमके, आशिष अग्रवाल, दिनेश बोरकुटे, रवींद्र बावणे, विशाल जांभुळकर, आकाश हिडामी, हेमराज दर्रो, फिरोज सोनकुकरा, एस. बी. चकाते, ए. एस. पिसे, हेमलाल देवांगन, आर. बी. सहारे, आर. बी. बावणे, नामदेव नागपुरे, विनोद गडपायले, के. एम. सूर्यवंशी आणि मिथुन मोडक यांनी रक्तदान केले.
रक्तदानासाठी युवकांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविल्याने शिबिराला सामाजिक सेवेचे स्वरूप प्राप्त झाले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
रक्तदानामुळे कोणत्याही प्रकारची शारीरिक हानी होत नसून ते आरोग्यासाठीही लाभदायक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. समाजातील अधिकाधिक युवकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ग्रामीण भागात अशा उपक्रमांमुळे रक्तदानाबाबत जागरूकता वाढण्यास आणि गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध राहण्यास मदत होत असल्याचेही सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सुरज हेमके यांनी केले. प्रास्ताविक आशिष अग्रवाल यांनी केले तर आभार सविता चंदनखेडे यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाचे अध्यक्ष नामदेव नागपुरे, सचिव सुरज हेमके, उपाध्यक्ष आशिष अग्रवाल, मनोज अग्रवाल, नितीन रहेजा, सविता चंदनखेडे, अमर बोळकुंटवार, दिनेश बोरकुटे, राजेंद्र मस्के, रवी सहारे, रवींद्र अटेला तसेच ग्रामीण रुग्णालय कोरची येथील डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध राहावा आणि रक्तदानाबाबत समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.













