गडचिरोली : ऐन प्रवासात एसटीने दिला दगा, सावरगावजवळ जंगलात प्रवासी अडकले

56

गडचिरोली : ऐन प्रवासात एसटीने दिला दगा, सावरगावजवळ जंगलात प्रवासी अडकले
– महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे हाल, बस देखभालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २४ : ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवेचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्याचे चित्र बुधवारी (दि. २४ जून) पाहायला मिळाले. गडचिरोलीहून मुरूमगावमार्गे सावरगावकडे जाणारी एमएच-०७ सी-९०८५ क्रमांकाची एसटी बस सावरगाव-चातगाव दरम्यानच्या जंगल परिसरात अचानक बंद पडल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती रस्त्यातच ठप्प झाली. दुर्गम वनक्षेत्र असल्याने बसमधील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध कामानिमित्त प्रवास करणारे प्रवासी जंगल परिसरातच अडकून पडले. पर्यायी वाहनांची तात्काळ व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रवाशांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. उन्हाचा तडाखा आणि वाहतुकीची मर्यादित साधने यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.
घटनेनंतर प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागातील नागरिक दैनंदिन प्रवासासाठी एसटी सेवेवर अवलंबून असताना बसेसची नियमित तपासणी आणि देखभाल होत नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला.
दरम्यान, बस बंद पडल्याची माहिती मिळताच संबंधित विभागाला कळविण्यात आले. तांत्रिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून बस दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, या प्रकारामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया गेला.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून जीवनवाहिनी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी बसेसची वेळोवेळी तपासणी व देखभाल करून सुरक्षित आणि सुरळीत सेवा उपलब्ध करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या घटनेमुळे एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here