देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई ; अवैध दारूसह ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
– वैनगंगा नदीकाठावर सापळा रचून कारवाई, एका आरोपीला अटक
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. त्याचाच भाग म्हणून देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड टाकत तब्बल ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दारूचा साठा पुरविणाऱ्या मुख्य आरोपीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार अवैध दारूविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, २१ जून रोजी देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, ब्रह्मपुरीहून देसाईगंजकडे एका रिट्झ कारमधून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूची वाहतूक केली जात आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी ब्रह्मपुरी–देसाईगंज मार्गावरील वैनगंगा नदीकाठ परिसरात सापळा रचला. काही वेळातच माहितीप्रमाणे संशयास्पद रिट्झ कार (क्र. एमएच-२० बीसी-८१६१) तेथे येताना दिसली. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता कारमध्ये २५ बॉक्समध्ये भरलेला संत्री कंपनीचा ९० मिली क्षमतेच्या २,५०० देशी दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत सुमारे २ लाख रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या रिट्झ कारची किंमत ४ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
वाहन चालक अमन अभिमन अलोने (वय २३, रा. मातावार्ड, देसाईगंज) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने हा दारूसाठा आशिष नरेंद्र डाहाट (वय ३७, रा. गांधीवार्ड, देसाईगंज) याचा असल्याची माहिती दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आली.













