निवृत्त नर्सेसच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढा : डॉ. उसेंडींची प्रशासनाला मागणी

70

निवृत्त नर्सेसच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढा : डॉ. उसेंडींची प्रशासनाला मागणी
– जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : निवृत्त आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका व आरोग्य पर्यवेक्षिकांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी केली. महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
डॉ. उसेंडी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात निवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित असल्याने त्यांना आर्थिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले. पेन्शनसंबंधी बाबी, विविध देयकांचे वितरण तसेच इतर प्रशासकीय प्रक्रियांमधील विलंब दूर करून संबंधित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी करण्यात आली.
संघटनेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करूनही काही प्रकरणे अद्याप निकाली न निघाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, असे डॉ. उसेंडी यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी निवेदन स्वीकारून संबंधित प्रकरणांची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे पदाधिकारी तसेच निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
“आरोग्य क्षेत्रात दीर्घकाळ सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या लाभांमध्ये विलंब होणे योग्य नाही. त्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करत राहील,” असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here