कोरची : दारूतस्करांचा डाव उधळला; चारचाकीसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
कोरची, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदी कायद्याला छेद देत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात कोरची पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात दारूसाठा आणि चारचाकी वाहन जप्त केले. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अडकण्याची चाहूल लागताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. या कारवाईत एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २२ जून) गुप्त बातमीदारामार्फत मसेली-कोरची मुख्य मार्गावरून एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती कोरची पोलिसांना मिळाली. माहितीची शहानिशा करून पोलिसांनी पंचांसह मसेली फॉरेस्ट नाका परिसरात सापळा रचला.
दरम्यान, संशयित वाहन त्या मार्गाने येताना दिसताच पोलिसांनी ते थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालकाने वाहन भरधाव वेगाने कैमुल रोडच्या दिशेने पळविले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. पुढेही पोलिसांचा बंदोबस्त असल्याचे लक्षात येताच चालकाने महिंद्रा कंपनीचे XUV-500 (क्र. MH-25 Z-8599) हे वाहन रस्त्याच्या कडेला सोडून घटनास्थळावरून फरार होण्याचा मार्ग स्वीकारला.
यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता काळ्या कपड्याखाली लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील अवैध दारूसाठा आढळून आला. तपासणीत गोवा व्हिस्कीच्या २० बॉक्समध्ये एकूण १,००० सिलबंद बाटल्या असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत सुमारे २ लाख रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची किंमत ५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशाप्रकारे एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुलराज, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक फौजदार दलपत मडावी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीनारायण टेंभरे, सार्वे आणि प्रमोद पाल यांनी सक्रिय सहभाग घेतला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #korchinews













