कोरची : खेत बचाव अभियानातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे
– बोटेकसा येथे मार्गदर्शन मेळावा; DSR तंत्रज्ञान, पोक्रा योजना व बीज प्रक्रियेवर भर
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. २२ : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक, तंत्रज्ञानाधारित व हवामान अनुकूल शेतीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर (गडचिरोली) आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा बोटेकसा येथे ‘खेत बचाव अभियान’ अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात आधुनिक शेती पद्धती, जलसंधारण, पोक्रा योजना आणि बीज प्रक्रियेचे महत्त्व यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी महेश परांजपे होते. त्यांनी वाढता शेती खर्च आणि बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर भाष्य करताना शेतकऱ्यांनी सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेती अधिक फायदेशीर करण्याचे मार्ग त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मार्गदर्शन करताना चिरडे यांनी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे हवामानात होत असलेल्या बदलांची माहिती दिली. त्याचबरोबर थेट भात पेरणी (डीएसआर) तंत्रज्ञानाचे फायदे सांगत पाण्याची व मजुरीची बचत करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. पिकांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. लाकडे यांनी गटशेतीचे महत्त्व पटवून देताना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) टप्पा-२ अंतर्गत उपलब्ध विविध योजनांची माहिती दिली. शेततळे, शेततळे अस्तरीकरण, बोडी खोलीकरण यांसारख्या जल व मृदसंधारणाच्या उपाययोजनांमुळे पाण्याचे स्त्रोत बळकट होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या नियोजनाविषयीही मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांनी पोक्रा योजनेची अंमलबजावणी, अर्ज प्रक्रिया आणि योजनेतील पारदर्शकता याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येणाऱ्या पीक प्रात्यक्षिकांबाबत माहिती देत नवीन वाणांचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी डी. जे. मसराम यांनी प्रत्यक्ष बीज प्रक्रिया व बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून तांत्रिक माहिती मिळाली.
या मेळाव्यामुळे बोटेकसा व परिसरातील शेतकऱ्यांना खरीपपूर्व नियोजन, डीएसआर तंत्रज्ञान, जलसंधारणाच्या योजना आणि बीज प्रक्रियेविषयी उपयुक्त माहिती मिळाली. त्यामुळे आगामी हंगामात उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोक्राचे प्रकल्प सहाय्यक अमित केराम, सहाय्यक कृषी अधिकारी सुनील जमकातन, प्रथमेश कराडे, पीएम-किसानचे अविनाश हुमणे तसेच कृषिताई टिकुला भानारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.













