धानोरा : अवैध मुरुम वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त, महसूल विभागाची मध्यरात्री धडक कारवाई
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २० : धानोरा तालुक्यातील चातगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने मोठी कारवाई करत भूमाफियांना चांगलाच दणका दिला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचून महसूल विभागाच्या पथकाने अवैध मुरुमाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर रंगेहात पकडून जप्त केले. या कारवाईमुळे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
चातगाव परिसरातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुरुम वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाईचे नियोजन केले. मध्यरात्री दबा धरून बसलेल्या पथकाने मुरुमाने भरलेले ट्रॅक्टर पकडून जप्त केले. जप्त वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालय, धानोरा येथे जमा करण्यात आले आहे.
प्राथमिक चौकशीत जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर चातगाव येथील सुरेश किसन शेणमारे यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले आहे. शासकीय महसूल बुडवून नैसर्गिक संपत्तीची चोरी केल्याप्रकरणी संबंधित वाहन मालकाविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.
तहसीलदार गणेश माळी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कारवाईत नायब तहसीलदार अल्पेश वसंत बारापात्रे, ग्राम महसूल अधिकारी अक्षय शेडमाके, दिनेश पदा, उत्तम गावडे आणि प्रसाद मडावी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
“तालुक्यात शासकीय महसूल बुडवून नैसर्गिक साधनसंपत्तीचे अवैध उत्खनन अथवा वाहतूक करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. दिवसा असो वा रात्री, अशा भूमाफियांविरोधात यापुढेही अधिक तीव्र आणि कठोर कारवाई सुरू राहील.”
– गणेश माळी, तहसीलदार, धानोरा
अवैध उत्खननाविरोधातील महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील भूमाफियांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाच्या पुढील मोहिमांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews













