गडचिरोली : भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी तातडीने आक्षेप नोंदवा, अन्यथा भवितव्य धोक्यात
– भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांना डाव्या लोकशाही पक्षांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांतील शेतजमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, संबंधित खातेदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कलम ३२ (२) अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ आंदोलन व मोर्चांवर विसंबून न राहता शेतकऱ्यांनी विहित मुदतीत लेखी आक्षेप सादर करून आपल्या जमिनींच्या भूसंपादनाला स्पष्ट विरोध नोंदवावा, असे आवाहन डाव्या लोकशाही पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भेंडाळा परिसरातील जमीन कोणत्याही परिस्थितीत जिंदाल स्टील प्रकल्पासाठी संपादित करण्याचा शासनाचा निर्धार दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून भूसंपादनाची प्रक्रिया पुढे नेली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतीजमिनी प्रकल्पासाठी देण्यास इच्छुक नसून त्यांचा विरोध कायम आहे. मात्र या विरोधाला कमकुवत करण्यासाठी कंपनीशी संबंधित घटक व काही राजकीय व्यक्तींकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
डाव्या लोकशाही पक्षांच्या मते, भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटिसींवर शेतकऱ्यांनी लेखी आक्षेप नोंदवला नाही, तर भविष्यात न्यायालयीन लढा उभारण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवायची आहे त्यांनी भूसंपादनाला स्पष्ट विरोध दर्शवणारे आक्षेपपत्र सादर करावे. आक्षेपपत्रामध्ये वाढीव मोबदला, प्रकल्पातील नोकरी किंवा चर्चेची मागणी न करता थेट भूसंपादनास विरोध दर्शवावा, असेही पक्षांनी स्पष्ट केले आहे.
काही राजकीय कार्यकर्ते शेतकऱ्यांना वाढीव दर, रोजगार किंवा इतर लाभांच्या आश्वासनांच्या माध्यमातून गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे. अशा प्रयत्नांपासून सावध राहण्याचे आवाहन शेतकरी बांधवांना करण्यात आले आहे.
हे आवाहन डाव्या लोकशाही आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार तसेच आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी संयुक्तरित्या केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














