कुरखेडा : उधारीच्या पैशांच्या वादातून काका-पुतण्यावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण
– चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०१ : उधारीने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून काका-पुतण्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी कुरखेडा शहरातील गजबजलेल्या फवारा चौकात घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी कुरखेडा पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शुभम कृष्णाजी आंबेकर (रा. वडसा) यांनी आरोपी विनोद श्रावण खंडाईत याला यापूर्वी एक लाख रुपये उधार दिले होते. वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याने शुभम आंबेकर हे त्यांचे काका घनशाम वासुदेव आंबेकर (रा. कढोली) यांच्यासह शनिवारी कुरखेडा येथे आले होते.
सायंकाळच्या सुमारास फवारा चौक परिसरात उधारीच्या पैशांवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. हा वाद क्षणातच विकोपाला गेला. यावेळी आरोपी विनोद खंडाईत, विकास खंडाईत तसेच त्यांचे साथीदार अरबाज व परवेझ यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने शुभम आणि घनशाम आंबेकर यांच्यावर बेछूट हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर सपासप वार केल्याने दोघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. भर चौकात घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
जखमी शुभम आंबेकर यांच्या तक्रारीवरून कुरखेडा पोलीस ठाण्यात आरोपी विनोद खंडाईत, विकास खंडाईत, अरबाज आणि परवेझ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे व सामूहिक कट रचणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. भर चौकात घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews














