कुरखेडा : दोन दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

63

कुरखेडा : दोन दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
– दोघे गंभीर जखमी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २९ : मालेवाडा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुलकुली गावाजवळ गुरुवारी (दि. २८ मे) रात्री दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील सुकाळा येथील जितेंद्र बाळकृष्ण मेश्राम (वय ३५) व त्यांची आई निर्मला बाळकृष्ण मेश्राम (वय ६०) हे मालेवाडा जवळील मुरमाळी येथे आयोजित लोहार समाजाच्या कार्यक्रमावरून दुचाकीने आपल्या गावी परतत होते.
दरम्यान, कुलकुली येथील डिडेश मसराम (वय ३०) व दिनेश मसराम (वय २८) हे मांगदा येथून कुलकुलीकडे दुचाकीने जात असताना कुलकुली गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
अपघात इतका भीषण होता की, डिडेश मसराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या जितेंद्र मेश्राम यांना उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत निर्मला मेश्राम व दिनेश मसराम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांवर शवविच्छेदनानंतर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या भीषण अपघातामुळे कुलकुली परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रात्रीच्या वेळी भरधाव वाहने आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here