विशेष सर्वेक्षण व संतृप्ती मोहिमेसाठी रांगी येथे प्रशासकीय बैठक संपन्न

16

विशेष सर्वेक्षण व संतृप्ती मोहिमेसाठी रांगी येथे प्रशासकीय बैठक संपन्न
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २९ : धानोरा तालुक्यातील रांगी येथे देशव्यापी अभियानांतर्गत “विशेष सर्वेक्षण व संतृप्ती मोहीम” अंतर्गत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. गावातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा थेट लाभ पोहोचवणे तसेच कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण व अभिवादन करून करण्यात आली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तहसीलदार गणेश माळी, विस्तार अधिकारी रोशन दुबे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत गावातील प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय योजनांची सद्यस्थिती आणि वंचित लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
बैठकीस महसूल कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष सर्वेक्षण व संतृप्ती मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here