ज्येष्ठांसाठी आनंदाची बातमी : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी १० मेपर्यंत अर्ज
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता यावे तसेच त्यांना आध्यात्मिक समाधान आणि मन:शांती लाभावी, या उद्देशाने राज्य शासनामार्फत “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
सन २०२६-२७ या कालावधीसाठी बिहार राज्यातील महाबोधी मंदिर, बोधगया येथे आयोजित करण्यात येणाऱ्या तीर्थयात्रेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांनी १० मे २०२६ पर्यंत संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक व वय नमूद करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
या योजनेसाठी अर्जदाराचे वय किमान ६० वर्षे असणे आवश्यक असून वयाच्या पुराव्यासाठी टी.सी. किंवा जन्म प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त २.५० लाख रुपये असावे किंवा अर्जदाराकडे पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी असून प्रवासासाठी सक्षम असल्याचे आणि संसर्गजन्य आजार नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
याशिवाय महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असून, ते उपलब्ध नसल्यास १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला ग्राह्य धरला जाणार आहे. योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रही अर्जासोबत जोडावे लागणार आहे.
सदर तीर्थयात्रेसाठी २५ मे २०२६ दरम्यान चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
योजनेविषयी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एलआयसी ऑफिस रोड, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.













