महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात PCOD क्लिनिक सुरू
– तज्ज्ञ उपचार, समुपदेशन व जीवनशैली मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या PCOD (Polycystic Ovarian Disease) या आजाराच्या प्रभावी निदान व उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे विशेष PCOD क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे. या क्लिनिकचे उद्घाटन ६ मे २०२६ रोजी उत्साहात पार पडले.
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक मुली व महिलांमध्ये PCODची समस्या वाढताना दिसत आहे. मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे, मुरूम येणे तसेच गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे मानली जातात. योग्य आहार, नियमित व्यायाम, समुपदेशन व वेळेवर वैद्यकीय उपचारांच्या माध्यमातून या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
महिलांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा, समुपदेशन तसेच आहार व जीवनशैलीबाबत नियमित मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हे विशेष क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मानसी कांबळे या दर बुधवारी पीसीओडीग्रस्त मुली व महिलांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे उपस्थित होत्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबरीश तिवारी, डॉ. इंद्रजीत नागदेवते, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. बागराज धुर्वे, सहाय्यक अधिसेविका श्रीमती आशा बावणे तसेच नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्रीमती मेघा कुलसुंगे उपस्थित होत्या.
कार्यक्रमास नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या पाठ्यनिर्देशिका, नर्सिंग विद्यार्थी तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वर्षा लहाडे यांनी महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. योग्य वेळी निदान, संतुलित आहार, नियमित व्यायाम व सकारात्मक जीवनशैलीच्या माध्यमातून PCODवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, असे त्यांनी नमूद केले. कोणतीही लक्षणे आढळल्यास महिलांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नर्सिंग प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी, विद्यार्थी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.













