घरातील जुनी पोथी ठरणार राष्ट्रीय ठेवा ; ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेला वेग
– १९५० पूर्वीच्या हस्तलिखितांच्या शोधासाठी प्रशासनाचे आवाहन; ‘Gyan Bharatam’ ॲपवरून नोंदणीची सुविधा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने ‘ज्ञानभारतम्’ (Gyan Bharatam) ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली असून, देशभरातील प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याचा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत आता गडचिरोली जिल्ह्यातही हस्तलिखितांच्या शोधाला वेग देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने देवस्थान मंडळे, धार्मिक संस्था, खाजगी संग्राहक तसेच नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये, देवस्थानांमध्ये किंवा जुन्या संस्थांमध्ये १९५० पूर्वीच्या पोथ्या, धार्मिक ग्रंथ, ऐतिहासिक कागदपत्रे आणि हस्तलिखित साहित्य जतन करून ठेवण्यात आलेले असण्याची शक्यता लक्षात घेता अशा मौल्यवान ठेव्याची शासनाकडे नोंद करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या उपक्रमातून विविध भाषांतील सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्वाच्या हस्तलिखितांचे जतन केले जाणार असून, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे डिजिटल स्वरूपात संवर्धन करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. देशाच्या ज्ञानपरंपरेचे संरक्षण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांना या प्रक्रियेत सहज सहभागी होता यावे यासाठी गुगल प्ले स्टोअरवर ‘Gyan Bharatam’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून हस्तलिखितांची माहिती, छायाचित्रे आणि आवश्यक तपशील ऑनलाइन अपलोड करता येणार आहेत. कोणत्याही भाषेतील प्राचीन हस्तलिखितांची नोंदणी या प्लॅटफॉर्मवर करता येणार असल्याने नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, ग्रंथालये, संशोधन संस्था आणि सांस्कृतिक संघटनांनीही या सर्वेक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी सहकार्य करावे, असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













