एसपीसी उपक्रमात धानोरा जि.प. हायस्कूलची दमदार बाजी ; जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला

31

एसपीसी उपक्रमात धानोरा जि.प. हायस्कूलची दमदार बाजी ; जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला
– विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान; पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०७ : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्टुडंट्स पोलिस कॅडेट (SPC) प्रोग्राम अंतर्गत धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभाग, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि सामाजिक जाणीव यामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सत्र 2025-26 मध्ये वर्ग 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने विविध आंतरवर्गीय व बाह्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कार्य केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून मानाचा तुरा रोवला.
या यशाबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले, पोलीस उपनिरीक्षक सुमित चेवले तसेच एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम टेम्भूर्णे यांच्या हस्ते प्रभारी मुख्याध्यापक पी. व्ही. साळवे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वेणूताई मशाखेत्री, उपाध्यक्ष जमीर कुरेशी, मनोज दुगा (एनपीसी), वैशाली मशाखेत्री, सरोज कोडापे, खुशाल मडावी, समिती सदस्य, शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन एसपीसी प्रमुख पी. बी. तोटावार यांनी केले, तर आभार कु. रजनी मडावी हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here