कुरखेडा वनविभागाचा स्तुत्य उपक्रम ; वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे, जनजागृतीवर भर
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २९ : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीव व पक्ष्यांची तहान भागावी, तसेच त्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने कुरखेडा वनपरिक्षेत्रांतर्गत कुरखेडा उपक्षेत्राने स्तुत्य पुढाकार घेत विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली आहे.
कुरखेडा, वडेगाव आणि जांभुळखेडा परिसरातील वनक्षेत्रात पक्ष्यांसाठी पाण्याची तसेच चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली असून, पर्यावरण संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सामाजिक संदेशांचे फलकही लावण्यात आले आहेत.
या संदेशांमधून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे, वणव्यापासून जंगलाचे संरक्षण करणे, वृक्षतोड रोखणे, नवीन वृक्षलागवड करणे तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्षेत्र सहाय्यक एस. एल. कंकलवार, वनरक्षक एस. डब्ल्यू. गोन्नाडे (कुरखेडा), एम. के. दुधबळे (वडेगाव), कु. एस. एन. वालदे (जांभुळखेडा) आणि कु. आर. एस. मुडमडीगेला (नर्सरी) यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
तसेच वनमजूर विकी गोबाडे, विवेक गहाणे, डोंगरावर, कुमरे, मडावी व कोरेटी यांनीही या कामात मोलाचे योगदान दिले. वनविभागाच्या या संवेदनशील आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनीही आपल्या परिसरात पशू-पक्ष्यांसाठी पाणी ठेवून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














