७७ वर्षांनंतर बीनागुंडा-लाहेरीत जिल्हाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक दौरा ; दुर्गम नागरिकांशी मुक्त संवाद

15

७७ वर्षांनंतर बीनागुंडा-लाहेरीत जिल्हाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक दौरा ; दुर्गम नागरिकांशी मुक्त संवाद
– नक्षलमुक्तीच्या दिशेने विश्वासाचा पूल ; रस्ता, नेटवर्क, आरोग्य व शेती विकासाला चालना
The गडविश्व
गडचिरोली,दि.२९ : गडचिरोली जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेलगतच्या अतिदुर्गम व पूर्वी नक्षलप्रभावित बीनागुंडा आणि लाहेरी परिसरात स्वातंत्र्यानंतर प्रथमच जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या संवेदनशील भागात जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
दौऱ्यादरम्यान त्यांनी वनपट्टेधारकांशी चर्चा करत तातडीने फार्मर आयडी तयार करून घेण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ या ओळखपत्राद्वारे मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांनी पक्का रस्ता, मोबाईल टॉवर, नियमित वीजपुरवठा, नवीन वनपट्टे आदी मूलभूत मागण्या मांडल्या. त्यावर तातडीने कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले.

दुर्गम वास्तवाचा प्रत्यक्ष आढावा

नागरिकांनी दाखले काढण्यासाठी भामरागडला जावे लागते, वीजपुरवठा वारंवार खंडित होतो, दुरुस्ती वेळेवर होत नाही अशा अडचणी मांडल्या. संबंधित विभागांना सूचना देऊन वीज व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. राशन वितरण नियमित सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

मुलांच्या शिक्षणावर भर

पालकांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी मुलांच्या भविष्याबाबत विशेष चर्चा केली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शाळा व अंगणवाडीत मुलांची उपस्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षकांना जबाबदारीने व निष्ठेने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

जवानांचा वाढवला उत्साह

बीनागुंडा पोलीस मदत केंद्राला भेट देत सी-६० कमांडो, सीआरपीएफ व एसआरपीएफ जवानांशी चर्चा करण्यात आली. दुर्गम भागातील त्यांच्या सेवाभावाचे कौतुक करत त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

लाहेरीत ग्रामसंवाद, फार्मर आयडी वाटप

लाहेरी ग्रामपंचायत भवनात नागरिकांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. वनपट्टेधारकांना फार्मर आयडीचे वितरण करण्यात आले. ग्रामस्थांनी आरोग्य, शिक्षण, ई-पीक पाहणी, धान खरेदी चुकारे, नेटवर्क समस्या व गोदाम अभाव यांसारख्या अडचणी मांडल्या.
बीएसएनएल नेटवर्क सुधारणा, 4G सुविधा, गुंडेनूर नाल्यावर पूल, राष्ट्रीय महामार्गाचे काम आणि धान साठवणुकीसाठी गोदाम उभारणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आरोग्य सेवांवर विशेष लक्ष

लाहेरी आरोग्य केंद्राची पाहणी करून मलेरिया प्रतिबंधासाठी नागरिकांनी मच्छरदाण्यांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तपासण्या, तातडीचे उपचार, फॉगिंग व जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत. सुमारे ३० हजार मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पुलांच्या कामाला दोन महिन्यांची मुदत

लाहेरी-बीनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्यावरील दोन पुलांच्या बांधकामाची पाहणी करत काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. दिरंगाई झाल्यास कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला.

पर्यटन विकासाची नवी दिशा

बीनागुंडा धबधबा परिसराला भेट देत हा भाग नक्षलमुक्तीकडे वाटचाल करत असून पर्यटनासाठी मोठी संधी निर्माण झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बीनागुंडा धबधब्यासह ११ पर्यटन स्थळांच्या विकासासाठी डीपीडीसी निधीतून आराखडा तयार होत असल्याची माहिती देण्यात आली.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here