धानोरा कृषी सेवा केंद्र संचालक बेमुदत संपावर : शेतकरी चिंतेत

8

धानोरा कृषी सेवा केंद्र संचालक बेमुदत संपावर : शेतकरी चिंतेत
– खरीपपूर्व तयारीवर परिणामाची शक्यता
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २८ : तालुक्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत २७ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. धानोरा तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू करण्यात आला असून याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे विविध मागण्या प्रलंबित असून वारंवार निवेदने, बैठका आणि आंदोलने करूनही केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे “आश्वासन नको, न्याय हवा” अशी भूमिका घेत हा संप सुरू करण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
कृषी सेवा केंद्र चालकांचे म्हणणे आहे की, बियाणे विक्री प्रक्रिया, खत कंपन्यांची लिंकिंग पद्धत, सॅम्पलिंगचे टार्गेट, क्लिष्ट ऑनलाइन ॲप प्रणाली यामुळे किरकोळ विक्रेत्यांवर अनावश्यक ताण पडत आहे. बियाण्यांचे नमुने निकृष्ट ठरल्यास दुकानदारांवर कारवाई केली जाते, मात्र उत्पादक कंपन्यांना जबाबदार धरले जात नाही, अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली.
संघटनेने शासनाकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. सॅम्पल फेल झाल्यास जबाबदारी बियाणे उत्पादक कंपन्यांवर निश्चित करावी, साथी ॲपसारख्या क्लिष्ट प्रणालीची सक्ती रद्द करावी, खत कंपन्यांची लिंकिंग पद्धत थांबवावी, तसेच परवानाधारक दुकानदारांना किरकोळ त्रुटींवरून त्रास देणे बंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत संप सुरू झाल्याने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते व कृषी औषधांचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
निवेदन देताना बशीर पिराणी, जयेंद्र गायकवाड, हारिस खान, साईनाथ गुरनुले, सचिन लाकूडवाहे, पुष्पाजी नरोटे, आकाश गावंडे, अजय दास यांच्यासह तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते.
आता शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे शेतकरी व कृषी व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here