कोरचीत भारत जनगणना 2027 प्रशिक्षणाचा पहिला टप्पा यशस्वी संपन्न

8

कोरचीत भारत जनगणना 2027 प्रशिक्षणाचा पहिला टप्पा यशस्वी संपन्न
– प्रगणक व पर्यवेक्षकांना घरगणना, नकाशे तयार करण्याचे सखोल मार्गदर्शन
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. २६ : भारत जनगणना 2027 अंतर्गत प्रभारी स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा पहिला टप्पा कोरची येथील तहसील कार्यालयात 23 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान यशस्वीरीत्या पार पडला. तहसीलदार तथा चार्ज अधिकारी प्रशांत गड्डम यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रशिक्षणात क्षेत्रीय प्रशिक्षक म्हणून उपकृषी अधिकारी प्रमोद आंबोरकर तसेच नगरपंचायतचे लेखा अधिकारी शाहिद खान पठाण यांनी सखोल मार्गदर्शन केले. तर तंत्रस्नेही म्हणून जगदीश गावतुरे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
या प्रशिक्षणात एकूण ७ प्रगणक व २ पर्यवेक्षकांनी सहभाग नोंदविला. घरगणना प्रक्रिया कशी राबवायची, माहिती संकलन करताना कोणती दक्षता घ्यायची, तसेच वार्डनिहाय नकाशे कसे तयार करायचे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष घरी भेट देत घरगणनेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यामुळे सहभागी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला.
या उपक्रमासाठी नगरपंचायत कोरचीचे कर्मचारी आशिष राघवते, नरेंद्र कोतकोंडावार व अनिता येरमे यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणादरम्यान सहभागी प्रगणक व पर्यवेक्षकांनी सर्व बाबी लक्षपूर्वक समजून घेत प्रत्यक्ष कामासाठी सज्ज असल्याचे दर्शविले.
भारत जनगणना 2027 च्या दृष्टीने कोरचीतील हा पहिला टप्पा यशस्वी ठरला असून पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here