२.६१ कोटींचा साठवण तलाव रखडला ; २०० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित, उपोषणाचा इशारा

19

२.६१ कोटींचा साठवण तलाव रखडला ; २०० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित, उपोषणाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २८ : धानोरा तालुक्याच्या सीमेवरील, मात्र आरमोरी तालुक्यातील जांभळी गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या २ कोटी ६१ लाख ६५ हजार रुपयांच्या साठवण तलावाचे बांधकाम दोन वर्षांपासून रखडल्याने गावातील शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित राहिले आहेत. प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि भूमिपूजन होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जांभळी गावात कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा नसल्याने ग्रामसभेने २१ सप्टेंबर २०२१ रोजी सर्वानुमते ठराव मंजूर करून साठवण तलावाचा प्रस्ताव गडचिरोली जिल्हा मृद व जलसंधारण विभागाकडे पाठविला होता. त्यानंतर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने १२ डिसेंबर २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता दिली. पुढे १२ फेब्रुवारी २०२४ रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली, तर २९ फेब्रुवारी २०२४ रोजी निविदा प्रक्रियेलाही मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी तब्बल २ कोटी ६१ लाख ६५ हजार ४२५ रुपये निधी मंजूर करण्यात आला.
प्रकल्प मंजूर झाल्यानंतर २८ सप्टेंबर २०२४ रोजी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले होते. त्यामुळे आता कामाला वेग येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र भूमिपूजनानंतरही प्रत्यक्ष कामाचा एकही टप्पा सुरू न झाल्याने गावकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. विशेष म्हणजे या तलावासाठी २०१६ मध्ये पेसा कायद्यांतर्गत ४० हेक्टर जागा अधिग्रहित करण्यात आली होती. सर्व प्रक्रिया पूर्ण असूनही काम सुरू न झाल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रखडलेल्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली. या बैठकीत आठ दिवसांत तलावाचे काम सुरू न झाल्यास गावकरी आमरण उपोषणास बसतील, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे प्रशासनासमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हा तलाव पूर्ण झाल्यास गावातील २०० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून भूजल पातळी वाढेल, विहिरींना पाणी मिळेल, शेती उत्पादनात वाढ होईल आणि गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचीही मोठी सोय होणार आहे. याशिवाय परिसरातील जैवविविधता वाढून पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल, तसेच भविष्यात हा तलाव पर्यटनाचे आकर्षण ठरू शकतो, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
सर्व मंजुरी, निधी आणि भूमिपूजन होऊनही २.६१ कोटींच्या जांभळी साठवण तलावाचे काम नेमके कधी सुरू होणार? असा संतप्त सवाल आता गावकरी प्रशासनाला विचारत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here