सामाजिक एकता दृढ करण्यासाठी सामूहिक विवाह प्रभावी माध्यम : चांगदेव फाये
– धमदिटोल्यात आदिवासी कवर समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २५ : सामाजिक एकता, परस्पर सहकार्य आणि समाजातील एकोप्याला बळकटी देण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी केले. ते धमदिटोला येथे आदिवासी कवर समाज क्षेत्रीय समितीच्या वतीने आयोजित ‘आदिवासी कवर समाज आदर्श विवाह संमेलन’ कार्यक्रमास भेट दिल्यानंतर बोलत होते.
या भव्य सोहळ्यात एकूण ११ जोडपी विवाहबद्ध झाली. पारंपरिक वातावरणात, उत्साहपूर्ण आणि आनंददायी माहोलात संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याने परिसरात सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
यावेळी कार्यक्रमास क्षेत्रीय समिती अध्यक्ष सुनेर सोनटापर, समाज मार्गदर्शक, सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णाजी चंद्रमा, प्रा. विनोद नागपूरकर, माजी सरपंच सैतुजी साहाळा, बिरबलचे चावर केवास, भगीरथ बेचनकुवर यांच्यासह समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना चांगदेव फाये म्हणाले की, सामूहिक विवाहामुळे अनाठायी खर्चाला आळा बसतो, वेळेची बचत होते आणि सर्व समाज एकत्र येण्याची संधी निर्माण होते. अशा उपक्रमांमुळे सामाजिक संघटन अधिक मजबूत होते. समाजाच्या प्रगतीसाठी दरवर्षी अशा स्वरूपाचे आयोजन होणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार समलसिंग दूधकावरा यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षेत्रीय अध्यक्ष सुनीलजी सोनटापर यांच्या नेतृत्वाखाली समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
धमदिटोला येथे पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्याने सामाजिक ऐक्य, परंपरा आणि सहकार्याचा सुंदर संदेश समाजासमोर ठेवला.














