पानटपरीवर पोलिसांची धाड ; ४४ हजार ६०० रुपयांची अवैध दारू जप्त

30

पानटपरीवर पोलिसांची धाड ; ४४ हजार ६०० रुपयांची अवैध दारू जप्त
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : पुराडा पोलीस स्टेशन हद्दीतील येंगलखेडा ते मालेवाडा मार्गावरील एका पानटपरीवर सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत ४४ हजार ६०० रुपयांचा देशी, विदेशी व हातभट्टी मोहफुल दारूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल २०२६ रोजी प्रभारी अधिकारी सपोनि. रविंद्र म्हैसकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, येंगलखेडा-मालेवाडा रोडवरील एका पानटपरीतून बेकायदेशीररीत्या देशी, विदेशी तसेच हातभट्टी मोहफुलची दारू विक्री सुरू आहे. या अवैध विक्रीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून मुख्य रस्त्यावर मद्यविक्रीमुळे ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. दुपारच्या सुमारास पोलिसांनी संबंधित पानटपरीवर छापा टाकत तेथून विविध प्रकारच्या दारूचा साठा जप्त केला.
या कारवाईत सपोनि. रविंद्र म्हैसकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दल्लूराम उईके, बापूजी सयाम, पोहवा गंगाधर कोटनाके, पोलिस अंमलदार पंकज बारसागडे, धनराज उईके, लक्ष्मी पाल यांनी सहभाग घेतला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह आरोपीविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here