स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाली, पण सुविधा अद्याप अपुऱ्या ; जांभळी ग्रामस्थांचा संताप
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २२ : तालुक्यातील रांगी गावाशी नाळ जुळलेल्या आणि आरमोरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जांभळी ग्रामपंचायतीवर सध्या विविध समस्यांचे सावट असल्याचे चित्र समोर येत आहे. स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी ग्रामस्थांनी दीर्घ लढा दिला, मात्र आजही मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पूर्वी जांभळी गावाची ग्रामपंचायत नरचुली येथे कार्यरत होती. नरचुली ते जांभळी हे सुमारे २५ किलोमीटर अंतर असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत सदस्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले.
मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांच्या १७ डिसेंबर २०२० च्या आदेशान्वये ग्रामपंचायत नरचुलीचे विभाजन होऊन २० डिसेंबर २०२० रोजी जांभळी ही स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आली. ग्रामस्थांच्या चिकाटीला यश मिळाले, मात्र त्यानंतरही अडचणी कायम असल्याचे वास्तव आहे.
आजतागायत जांभळी ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आलेली नाही. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीतून तात्पुरत्या स्वरूपात चालविला जात आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. याशिवाय ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र सचिवाचीही नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जांभळी ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र इमारतीसाठी अनुदान मंजूर करावे तसेच ग्रामपंचायत सचिव पदाची नियुक्ती करून प्रशासन सुरळीत करावे, अशी कळकळीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews














