नक्षलविरोधी मोहिमेत धडाकेबाज कामगिरी ; ‘सी-६०’ जवान प्रशांत बारसागडे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा सन्मान
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.२० : गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील नक्षलविरोधी मोहिमेत उल्लेखनीय व धाडसी कामगिरी बजावणाऱ्या ‘सी-६०’ पथकातील पोलीस शिपाई प्रशांत बारसागडे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रतिष्ठेचा “विशिष्ट ऑपरेशन” सन्मान प्रदान करण्यात आला. मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला.
मूळचे कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील रहिवासी असलेले बारसागडे सन २०१२ मध्ये जिल्हा पोलीस दलात दाखल झाले. नियुक्तीपासूनच त्यांची नेमणूक नक्षलविरोधी कारवायांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सी-६०’ या विशेष पथकात करण्यात आली. कठीण भौगोलिक परिस्थितीत आणि जीवाची पर्वा न करता त्यांनी अनेक संवेदनशील मोहिमांमध्ये सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
गेल्या काही वर्षांत जिल्हा मुख्यालयातून राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी मोहिमांच्या नियोजनात तसेच प्रत्यक्ष कारवायांमध्ये बारसागडे यांचे योगदान ठळक राहिले आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत एटीएसचे प्रमुख नवल बजाज यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र व “विशिष्ट ऑपरेशन पदक” प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातून नक्षलवाद संपवण्याचा निर्धार व्यक्त करत दिलेल्या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कारवाया राबविण्यात आल्या आहेत. या मोहिमांमध्ये ‘सी-६०’ पथकाची भरीव भूमिका राहिली असून, त्याचाच एक भाग म्हणून बारसागडे यांच्या कार्याला हा मानाचा मुजरा मानला जात आहे.
या सन्मानामुळे जिल्हा पोलीस दलात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, बारसागडे यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.













