अवैध दारूसह ‘महिंद्रा थार’ जप्त ; 14.90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

28

अवैध दारूसह ‘महिंद्रा थार’ जप्त ; 14.90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
– एटापल्ली पोलिसांची धडक कारवाई 
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर एटापल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 14 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे 19 एप्रिल रोजी पोलिसांनी सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका चारचाकी वाहनातून देशी व विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची खात्री पटताच उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध मार्गांवर नाकाबंदी केली.
दरम्यान, एमएच 32 एएस 7099 क्रमांकाचे वाहन नारानूर–ताडपल्ली मार्गे लांझीकडे येताना दिसताच पोलिसांनी ते अडवून तपासणी केली. वाहनाची पाहणी करताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा आढळून आला. पंचासमक्ष तपासणीदरम्यान रॉकेट संत्रा देशी दारूच्या 29 सिलबंद पेट्या व एक पेटी बिअर असा एकूण 2 लाख 90 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा थार ही चारचाकी (अंदाजे किंमत 12 लाख रुपये) देखील जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण 14 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी आरोपी मयूर विजय बालमवार (रा. गडचिरोली) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ), 83 तसेच मोटार वाहन कायदा कलम 177 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तीक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मचिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या पार पडली असून अवैध दारू व्यवसायाविरुद्ध पोलिसांचा धडाकेबाज इशारा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here