कोटगलच्या स्वातीची दमदार झेप : वयाच्या 19 व्या वर्षी पोलीस शिपाई व चालक पदावर दुहेरी निवड

17

कोटगलच्या स्वातीची दमदार झेप : वयाच्या 19 व्या वर्षी पोलीस शिपाई व चालक पदावर दुहेरी निवड
– शून्यातून घडवली यशोगाथा
The गडविश्व
गडचिरोली, दि.१८ : परिस्थितीशी दोन हात करत, योग्य मार्गदर्शन आणि अथक परिश्रमाच्या जोरावर कोटगल येथील स्वाती मोहन समर्थ हिने अवघ्या 19 व्या वर्षी जिल्हा पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस चालक शिपाई या दोन्ही पदांवर निवड मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची ही यशोगाथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

स्वातीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोटगल येथे झाले. त्यानंतर तिने कमलाताई मुनघाटे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले, तर पुढे गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयात तिने उच्च शिक्षण घेतले. विशेष म्हणजे, लहानपणापासून पोलीस होण्याची कोणतीही ठाम इच्छा नसतानाही परिस्थितीने तिला हा मार्ग निवडण्यास प्रवृत्त केले.

मध्यमवर्गीय कुटुंबातील जबाबदाऱ्या लक्षात घेता, लवकरात लवकर नोकरी मिळवून घराला हातभार लावण्याचा तिचा निर्धार होता. तीन बहिणींमध्ये दुसरी असलेल्या स्वातीवर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी जाणवत होती. त्यामुळे कमी खर्चात आणि मेहनतीच्या जोरावर नोकरी मिळवून देणारा पर्याय म्हणून तिने पोलीस भरतीची वाट निवडली.

या प्रवासात तिच्यासोबत मैत्रीण स्नेहा रामटेके हिची साथ लाभली. दोघींनी मिळून एकाच ठिकाणी संपूर्ण तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 10 ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी लक्ष्यवेध अकॅडमी गडचिरोली येथे प्रवेश घेतला. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी प्रा. राजीव सर यांनी
“छान अभ्यास करा छान तयारी करा, तुम्ही करू शकता” असा दिलेला आत्मविश्वासाचा मंत्र स्वातीच्या मनात खोलवर रुजला.

12 ऑगस्ट 2024 पासून नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ग्राउंडची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे, गावाजवळ ग्राउंड असूनही यापूर्वी कधीही सराव न केलेल्या स्वातीने शून्यापासून सुरुवात केली. सुरुवातीला ग्राउंड निघेल की नाही, अशी भीती तिच्या मनात होती; मात्र सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःवरील विश्वास यामुळे तिने शारीरिक चाचणीत उत्कृष्ट कामगिरी केली.

लेखी परीक्षेसाठी अकॅडमीतील दिनेश देशमुख सर यांनी गणित विषय अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकवला. विविध ट्रिक्स आणि उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी गणिताची भीती दूर केली. तसेच प्रत्येक वर्गाच्या शेवटी कविता ऐकवून वातावरण उत्साही ठेवण्याची त्यांची पद्धत विद्यार्थ्यांना विशेष भावली.

अकॅडमीचे संचालक प्रा. राजीव सर यांनी मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान विषय अत्यंत सखोलपणे शिकवले. केवळ अध्यापनच नव्हे, तर विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेणे, त्यांच्या चुका दाखवून देणे, योग्य वर्तन आणि शिस्त यांचे धडे देणे, यामुळे स्वातीचा सर्वांगीण विकास झाला. सुरुवातीपासूनच सरांनी तिच्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेले प्रोत्साहन तिच्या आत्मविश्वासाला बळ देणारे ठरले.

अकॅडमीतील सर्व शिक्षक, ग्राउंडवरील सहकारी मुलामुली आणि मित्रमैत्रिणी यांचेही स्वातीच्या यशात मोठे योगदान आहे. “ग्राउंडवरील सर्वांनी मला लहान बहिणीसारखे मानले, अडचणी समजून घेतल्या आणि सतत प्रोत्साहन दिले,” असे ती नमूद करते.

अखेर तिच्या अथक परिश्रमांना यश मिळाले आणि पहिल्याच प्रयत्नात तिने दुहेरी यश संपादन केले. “शून्यापासून सुरुवात करून आज येथे पोहोचणे शक्य झाले, ते केवळ शिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबाचा पाठिंबा आणि माझ्या मेहनतीमुळे,” असे स्वाती नम्रपणे सांगते.

आपल्या यशाचे श्रेय ती आई-वडील, कुटुंबीय, मोठी बहीण, लक्ष्यवेध अकॅडमीचे सर्व शिक्षक, तसेच मित्रमैत्रिणींना देते. तसेच ‘The गडविश्व’चे संपादिका हिताश्री एस. जिवतोडे यांनी आपले अनुभव मांडण्याची संधी दिल्याबद्दलही ती कृतज्ञता व्यक्त करते.

आज स्वातीने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, तिची ही प्रेरणादायी यशोगाथा ग्रामीण भागातील तरुणींना नवे स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारी ठरत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #SuccessStory #Inspiration #WomenEmpowerment #PoliceBharti #DreamBig #HardWorkPaysOff #Dedication #YouthInspiration #GirlPower #FromZeroToHero #NeverGiveUp #Achievement #CareerGoals #MotivationDaily #ProudMoment #IndianYouth #RuralTalent #WomenInUniform #PoliceLife #SuccessJourney

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here