गडचिरोलीत भीषण अपघात : वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकाचा मृत्यू

40

गडचिरोलीत भीषण अपघात : वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकाचा मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : चामोर्शी-आष्टी मार्गावरील जामगिरी फाट्याजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक विनोद कुमरे (वय ५७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत कारमधील अन्य तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून चामोर्शी-गडचिरोली मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, ते थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच पुन्हा एकदा चामोर्शी-आष्टी मार्गावर कार आणि ट्रकच्या भीषण धडकेने आणखी एक जीव गमवावा लागल्याने या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुमरे हे आपल्या सहकाऱ्यांसह एका अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून टाटा इंडिका कारने आष्टीहून चामोर्शीकडे येत होते. दुपारी सुमारे १:३० वाजताच्या सुमारास जामगिरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली.
या अपघातात कारच्या मागील सीटवर बसलेल्या कुमरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, कारमधील अमोल देशपांडे (४०), कुणाल मुळके (२८) आणि योगेश वरखडे (४०) हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश खोब्रागडे व पथक पुढील तपास करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुमरे यांच्या निधनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शोककळा पसरली आहे. तसेच वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावर तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here