अंत्यविधी-सरपणासाठी जळाऊ लाकूड निस्तार दरात द्या : रवींद्र गोटेफोडे

45

अंत्यविधी-सरपणासाठी जळाऊ लाकूड निस्तार दरात द्या : रवींद्र गोटेफोडे
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०९ : अंत्यविधी व घरगुती सरपणासाठी आवश्यक असलेले जळाऊ लाकूड निस्तार दरात उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांनी वन विभागाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी ७ एप्रिल रोजी कुरखेडा येथील वन परिक्षेत्र कार्यालयात भेट देत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
कुरखेडा शहर व तालुक्यातील नागरिकांना अंत्यविधीसाठी वेळेवर जळाऊ लाकूड मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांना लाकडासाठी भटकंती करावी लागणे ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याचे गोटेफोडे यांनी नमूद केले. सध्या वन आगारात उपलब्ध असलेल्या जळाऊ बिटाचा दर सुमारे ३,२०० प्रति बिट असल्याने तो गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
तसेच, सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे अनेक कुटुंबांना सरपणासाठी जळाऊ लाकडावर अवलंबून राहावे लागत आहे. लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमध्येही लाकडाची गरज भासते; मात्र पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच निस्तार दरात जळाऊ बिट उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, वनक्षेत्र सहाय्यक संजय कंकडलवार यांनी अंत्यविधीसाठी लागणाऱ्या जळाऊ लाकडाच्या दरात कपात करण्यासाठी उपवनसंरक्षक स्तरावर प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. गेल्या दोन वर्षांपासून निस्तार दरात लाकूड उपलब्ध नसल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, यावर्षी कूप कटाईच्या नियोजन आराखड्याला मंजुरी मिळाल्याने जंगल कामगार सहकारी संस्थेमार्फत लवकरच कामाला सुरुवात होणार असून, पुढील वर्षांपासून निस्तार दरात जळाऊ बिट उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वनरक्षक एम. के. दूधबळे हेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here