सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा : माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी

28

सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा : माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी
– सिरोंच्यात भाजपा कार्यकर्त्यांची निवासी कार्यशाळा उत्साहात संपन्न
The गडविश्व
सिरोंचा, दि. ०८ : भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६’ अंतर्गत सिरोंचा येथे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. ७ ते ८ एप्रिलदरम्यान क्रीडा संकुलात आयोजित या कार्यशाळेत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वैचारिक आणि संघटनात्मक बळकटी देण्यावर भर देण्यात आला.
कार्यशाळेत माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. “सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांनी जनतेशी थेट संवाद साधत योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवावी,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी सरकारच्या विविध जनहितकारी योजनांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ या विचारसरणीवर विशेष भर देण्यात आला. सेवा, समर्पण आणि राष्ट्रहित या मूल्यांवर आधारित कार्यपद्धती अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.
माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी पक्षाचा इतिहास, विचारधारा आणि संघटनात्मक कार्यपद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मूलभूत मूल्यांवर ठाम राहून जनसेवेला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना शेतकरी हितासाठी काम करण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षणात भाजपचा इतिहास, वैचारिक अधिष्ठान, कार्यविस्तार, बूथ व्यवस्थापन, तसेच सरकारच्या योजनांची अंमलबजावणी अशा विविध विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांचे नेतृत्व, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला राजे अंब्रिशराव आत्राम, रमेश भुरसे, अवधेशबाबा आत्राम, प्रकाश गेडाम, सत्यम मनचर्लावर, श्रीनाथ राऊत, शंकर नरहरी, दामोधर अरगेला, डॉ. श्रीकांत सुगरवार, संतोष पडाला, किरणताई कुलसंगे, शरीख शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here