कुरखेडा : वीज कोसळून युवकाचा मृत्यू
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०५ : तालुक्यातील रामगड येथे रविवारी सकाळच्या सुमारास विजेचा वीज कोसळून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. दिशांत रेवाराम सतीमेश्राम ( रा. मुरमाडी/पारडी, ता. लाखादूर, जि. भंडारा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिशांत हा रामगड येथे ‘गणेश डेकोरेशन’कडे काम करत होता. गावात सुरू असलेल्या लग्न समारंभासाठी तो डेकोरेशनचे काम करत असताना अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि विजांच्या कडकडाटात अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. या भीषण घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान, कामाच्या निमित्ताने घरापासून दूर आलेल्या दिशांतच्या आकस्मिक मृत्यूने रामगडसह त्याच्या मूळगाव मुरमाडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
#thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














