भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय सूडातून : तक्रारदारांवर मानहानीचा इशारा, रामगड ग्रामपंचायतीचे प्रत्युत्तर

24

भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय सूडातून : तक्रारदारांवर मानहानीचा इशारा, रामगड ग्रामपंचायतीचे प्रत्युत्तर
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०१ : रामगड ग्रामपंचायतीत ६२.९४ लाख रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने सविस्तर स्पष्टीकरण देत ठोस भूमिका मांडली आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ‘सर्व आरोप तथ्यहीन असून केवळ राजकीय द्वेषातून ग्रामपंचायतीची बदनामी केली जात आहे,’ असा ठाम दावा प्रशासनाने केला.
ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांनी स्पष्ट केले की, १५ व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेला प्रत्येक निधी हा ग्रामसभेच्या ठरावानुसार व शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच खर्च करण्यात आला आहे. ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) तसेच विविध कामांचे जिओ-टॅगिंग ऑनलाईन उपलब्ध असून, त्यामध्ये कोणतीही अनियमितता आढळत नाही. सन २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीतील सर्व लेखापरीक्षणे पूर्ण झाली असून, त्यात कुठलाही भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नळ योजनेच्या पाण्यात ‘नारू’ आढळल्याच्या बातमीवरही प्रशासनाने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. “ही बातमी पूर्णपणे निराधार असून, जाणीवपूर्वक भीती आणि संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार आहे,” असे सांगत, संबंधित आरोपकर्त्यांवरच शंका उपस्थित करण्यात आली.
माहिती अधिकारांतर्गत माहिती देण्याची प्रक्रिया सुरू असताना अर्धवट माहितीच्या आधारावर आरोप करण्यात येत असल्याने विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
या सर्व आरोपांमुळे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत, संबंधित तक्रारदारांविरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा (मानहानीचा) दावा दाखल करण्याचा गंभीर विचार सुरू असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी तुमलाम व सदस्य प्रल्हाद केवळराम नैताम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here